जिल्हा प्रशासनाने नव्याने पारित केलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हाभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळी, शिवभोजन थाळी केंद्र, जिम, सलून, ब्यूटिपार्लर, वेलनेस सेंटर यासह पादचारी मार्गावर थाटण्यात आलेली दुकाने सोमवारपासून सुरू करण्यात आली.
दरम्यान, आस्थापना, प्रतिष्ठान चालकांसह नागरिकांनी तोंडाला मास्कचा वापर करण्यासह फिजिकल डिस्टन्सिंग राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा भारतीय दंडसंहिता १८६० मधील कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० नुसार शिक्षेस पात्र अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला. त्याउपरही निर्बंध शिथिल केल्याच्या पहिल्याच दिवशी नियमांची पूर्णत: मोडतोड करण्यात आल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. ही बाब कोरोना संसर्ग कमी होण्याऐवजी वाढण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
...
वाशिममध्ये मुख्य चाैकांमध्ये वाहतूक विस्कळीत
प्रशासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आल्याने सोमवारी (दि.७) सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधीत सर्वच दुकाने सुरू राहिली. यादरम्यान शहरातील व्यापारपेठेत नागरिकांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले. पाटणी चाैक, रिसोड नाका, अकोला नाका, पोस्ट ऑफिस चाैक, पुसद नाका, हिंगोली नाका आदी ठिकाणी वाहनांची रेलचेल वाढल्याने वाहतूक अनेकवेळा विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले.
..................
दुपारी ४ नंतरही दुकाने सुरूच
प्रशासनाने दुकाने सुरू ठेवण्यास सकाळी ७ ते दुपारी ४ ही वेळ ठरवून दिलेली आहे. असे असताना चार वाजेनंतरही वाशिम शहरातील अनेक दुकाने सुरूच असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहनातील ध्वनिक्षेपकाद्वारे दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.
................
नगरपरिषदेकडून नियम पाळण्याचे आवाहन
निर्बंध शिथिल झाल्याच्या पहिल्या दिवशी वाशिम नगरपरिषदेच्या पथकाने बाजारपेठेत फिरून सर्वांना कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन केले. नागरिकांनी गाफील न राहता स्वत:ची काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्याची माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केल्या.