वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ९ मेपासून जिल्ह्यात लागू असलेले कडक निर्बंध १ जूनपासून शिथिल झाले आहेत. आता सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत अत्यावश्यक सेवेप्रमाणेच इतरही दुकाने सुरू ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ३१ मे रोजी जारी केले. दुसरीकडे हॉटेल, रेस्टॉरंट, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, सार्वजनिक क्रीडांगण, उद्याने, बगीचे, भाजीमार्केट, आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंदच राहणार आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ९ ते ३१ मेपर्यंत कडक निर्बंध लागू होते. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास बरीच मदत झाली असून, रुग्णसंख्या घटली आहे. दुसरी लाट ओसरत असल्याचे पाहून कडक निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानुसार, किराणा, फळ, भाजीपाला, पिठाची गिरणी, दूध डेअरी, मांस, अंडी, रेशन दुकाने, कृषिसेवा केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, आपले सरकार सेवा केंद्र आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दूध डेअरी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू राहील. घरपोच दूध वितरण सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत करता येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व स्वरूपाची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत सुरू राहतील. शनिवार व रविवार या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व दुकाने, सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.
०००
बॉक्स
हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा!
हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी केंद्र येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही.
००००००
आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंदच
आठवडी बाजार, गुरांचे बाजार, भाजीबाजार यासह केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, सार्वजनिक क्रीडांगण, उद्याने, बगीचे, सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था बंदच राहणार आहेत.
००००
दोन दिवस अन्य दुकाने बंद
अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतील. उर्वरित सर्व दुकाने बंद राहणार आहेत.