राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंंध आणखी कठोर करण्याचे बुधवारी जाहिर केले. गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून नवीन नियमावली लागू झाली असून, वाशिम जिल्ह्यातही अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हयात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व कडक निर्बंधाची अंमलबजावणी म्हणून बुधवारी जिल्हा प्रशासनाने आढावा घेतला. जिल्हाबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी म्हणून जिल्ह्याच्याच सिमेवर ३३ नाकाबंदी तसेच ५८ तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. परजिल्ह्यातून विनापरवाना कुणी वाशिम जिल्ह्यात येणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक प्राधिकरणे, सहकारी, सरकारी, आणि खासगी बँका, अत्यावश्यक सेवा पुरवणारी कार्यालये, फार्मासिटिकल कंपन्यांची कार्यालये, बँका, नॉन बैंकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्यूट, लघु कर्ज देणाऱ्या संस्था अशा सर्व कार्यालयांमध्ये एकूण कर्मचायांच्या १५ टक्के कर्मचारी बोलाविण्याचे नियोजन संबंधित विभाग प्रमुखांनी करावे, असे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले. लग्न समारंभावर मर्यादा असून, २५ लोकांच्या उपस्थितीत दोन तासात लग्न सोहळा पार पाडावा लागणार आहे. बसेस वगळता इतर सर्व प्रवासी वाहतूक चालक वगळता ५० टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत सुरू ठेवता येणार आहे. नव्याने लागू झालेल्या नियमावलीचे जिल्हावासियांनी पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.
निर्बंध कडक; जिल्हाबंदीसाठी प्रशासन सज्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:43 AM