लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शरीर रचनाशास्त्रात संशोधनासाठी मदत व्हावी, या उद्दात हेतुने मंगरुळपीर येथील सिद्धार्थ विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक के. टी. मुंजे आणि त्यांच्या पत्नी राही मुंजे यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोंदणी करून मान्यताही मिळविली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम दस्तापूर येथील मूळ निवासी व मंगरूळपीच्या सिद्धार्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेले के.टी. मुंजे हे पुरोगामी विचारसरणीचे व्यक्ती आहेत. त्यांच्या मुलाने वैद्यकीय क्षेत्रातील एमडी ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, त्यांच्या याच मुलाला एमबीबीएसच्या अभ्यासक्रमादरम्यान शरीर रचनाशास्त्राचा अभ्यास करतेवेळी मानवी मृतदेह उपलब्ध होऊ शकला नव्हता. प्रत्यक्षात वैद्यकीय अभ्यासक्रमात शरीर रचनाशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थी पारंगतच होऊ शकत नाही. आपल्या मुलास आलेली अडचण इतर विद्यार्थ्यांना येऊन त्यांच्या अभ्यासक्रमात बाधा निर्माण होऊ नये म्हणून थोडा हातभार लावण्यासाठी के. टी. मुंजे यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. त्यांचा हा उदात्त विचार त्यांच्या सुविद्य पत्नी राही मुंजे यांनाही आवडला आणि पतीबरोबर त्यांनीही मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. यासाठी दोघांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोंदणी केली आणि शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख यांचेकडून देहदान निर्णय मान्यता प्रमाणपत्र मिळविले आहे.
सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा सपत्निक मरणोत्तर देहदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:32 PM