लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : १७ वर्षे देशाची इमानेइतबारे सेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकास सजविलेल्या रथात सहपरिवार विराजमान करून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी सुंदर रांगोळ्या काढून मिरवणूक मार्ग सजविला. मिरवणूकीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कारंजा तालुक्यातील विळेगावच्या ग्रामस्थांनी एका सैनिकाप्रती दाखविलेली ही कृतज्ञता चर्चेचा विषय ठरला आहे.विळेगावचे भूमिपूत्र असलेले राजेश सावरकर १७ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. यादरम्यानच्या काळात त्यांनी विविध ठिकाणी कर्तव्य बजावून भारतमातेची सेवा केली. २ नोव्हेंबर रोजी ते सेवेतून निवृत्त होऊन आपल्या गावी परतले. यावेळी त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे नियोजन करून विळेगावच्या महिला-पुरूषांनी जय्यत तयारी केली. राजेश सावरकर व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना सजविलेल्या रथात विराजमान करून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान ठिकठिकाणी सावरकर यांना औक्षण करण्यात आले. मिरवणुकीनंतर श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरासमोरील प्रांगणात त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यासोबतच मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने राजेश सावरकर यांच्या पत्नी वैशाली यांचाही साडीचोळी देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच मालाताई घुले, उपसरपंच रामराव मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य तुळशिराम घुले, गजानन काजे, किरण घुले, श्रीकृष्ण धाये यांच्यासह सावरकर यांची आई उपस्थित होते. युवकांनी देशसेवेचे व्रत अंगीकारून सैन्यात दाखल व्हावे, असे आवाहन यावेळी माजी सैनिक राजेश सावरकर यांनी केले.
विळेगावात निवृत्त सैनिकाची वाजतगाजत मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 2:26 PM