गेले १७ दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी रात्री जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिकानादेखील संजीवनी मिळाली आहे. जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात पावसाने अधूनमधून हजेरी लावली. त्यामुळे खरिपाची पेरणीही ९८ टक्के पूर्ण झाली; परंतु जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने दडी मारली. त्यामुळे लाखो हेक्टरमधील पिके संकटात सापडली काही शेतकऱ्यांनी, तर पिके सावरण्याची शक्यताच नसल्याने उभ्या पिकांवर नांगर फिरवून दुबार पेरणीची तयारीही केली. काही शेतकरी सिंचनाच्या आधारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करतानाही दिसले. कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी मात्र शेतकरी आकाशाकडे टक लावून पाहत होते. अखेर बुधवारी रात्री आणि गुरुवारी पावसाने जिल्ह्यात पुनरागमन केले. त्यामुळे लाखो हेक्टरमधील पिकांना दिलासा मिळाला. मंगरूळपीर, रिसोड तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक राहिले, तर वाशिम, मानोरा तालुक्यातही पिकांना आधार देणारा पाऊस पडला.
----------------------
कारंजा, मालेगावची स्थिती बिकट
जिल्ह्यात १७ दिवसांनी पावसाचे पुनगरामन झाले. त्यात बुधवारी रात्री मंगरूळपीर तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली, तर वाशिम तालुक्यात ६.५ आणि मानोरा तालुक्यात ४.२ असा पिकांना जेमतेम आधार देणारा पाऊस पडला; परंतु कारंजा आणि मालेगाव तालुक्यात मात्र पावसाचा अद्यापही पत्ताच नाही. बुधवारी रात्री मालेगाव तालुक्यात १.७ मि.मी. तर कारंजा तालुक्यात केवळ ०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली.
------------
मंगरूळपीरमध्ये २० मि.मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नव्हता; परंतु सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे चांगला आधार मिळाला. जिल्ह्यात बुधवार ७ जुलै रोजीच्या २४ तासात सरासरी ७.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंगरूळपीर तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक होते. या तालुक्यात उपरोक्त २४ तासातच २० मि.मी. पावसाची नोंद झाली.
-------------------
नदी, नाले तहानेलेलेच
जिल्ह्यात यंदा ८ जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या ३१.५ टक्के आणि मासिक सरासरीच्या १०८.३ टक्के पाऊस पडला असला तरी जिल्ह्यातील नद्या, नाल्यांचे पात्र कोरडेच असल्याचे दिसत आहे. एरव्ही जुलै महिन्यात खळखळ वाहणारे बहुतांश नाले आणि मुख्य नद्यांचे पात्रही सार्वत्रिक पावसाचा अभाव असल्याने कोरडेच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.