कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रियेस शासनाने हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयासह विविध विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी समुपदेशन पद्धतीने प्रशासकीय बदली प्रक्रिया राबविल्याने कर्मचाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करण्यात आली. जवळपास ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक, मंडळ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासकीय बदल्या झाल्यानंतर विनंतीवरून बदली प्रक्रिया केव्हा सुरू होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. येत्या आठवड्यात विनंती बदल्यांची प्रक्रिया होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
०००००
कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू
जिल्हाधिकारी कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या काही कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहे. बहुतांश कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू झाले आहेत तर बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू होणे बाकी असल्याची माहिती आहे.