लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी १२ मार्च रोजी कारंजा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत कोरोना विषाणू संसर्ग सद्य:स्थितीचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी शहरी व ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासह कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.याप्रसंगी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे, गट विकास अधिकारी कालिदास तापी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब डोल्हारकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.विभागीय आयुक्त म्हणाले, जिल्ह्यामध्ये कारंजा तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागातही रुग्ण संख्या अधिक असल्याने दोन्ही क्षेत्रांत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले. (प्रतिनिधी)
कोरोना उपाययोजनांचा आयुक्तांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 11:32 AM