याप्रसंगी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे, गट विकास अधिकारी कालिदास तापी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब डोल्हारकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त म्हणाले, जिल्ह्यामध्ये कारंजा तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागातही रुग्ण संख्या अधिक असल्याने दोन्ही क्षेत्रांत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.
.................
अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही चाचणी करून घ्यावी
सर्व खाजगी आस्थापनाधारकांची कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीसुद्धा चाचणी करून घ्यावी. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र तयार करून तेथील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करावी. तालुक्यात ज्या भागात जास्त रुग्ण आढळले आहेत, त्या भागांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
.............
कोविड केअर सेंटर, प्रतिबंधित क्षेत्राला भेट
कोरोनाबाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या तुळजा भवानी मंगल कार्यालय येथील कोविड केअर सेंटरला विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. तसेच सिंधी कॅम्प येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.