शिवण बु. गावाला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी मंगळवारी गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत शिवण बु. गाव समृद्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. या स्पर्धेअंतर्गत नरेगा आणि इतर योजनांच्या माध्यमातून जलसंधारणासह कृषीविषयक विविध कामे केली जाणार आहेत. यात सुरुवातीला गावकऱ्यांनी लोकसहभागातून एक काम पूर्णत्वास नेल्यानंतर प्रशासन इतर कामांसाठी मशीन उपलब्ध करून देईल. नरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या कामांचा लाभ गावकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत लोकसहभागातून काम करण्याची तयारी दर्शविली. यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल गावचे रोजगार सेवक शरद पवार यांचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनीही नॅडेप व गांडूळ खतनिर्मितीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद २० शेतकऱ्यांनी नॅडेप, गांडूळ खतनिर्मितीसाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली. या कार्यक्रमाला ग्रामसेविका ननीर, कृषी सहायक सोळंके, तलाठी घोगरे, पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-------
सहकार्य करणाऱ्यांस कर वसुलीत सूट
समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होऊन गाव समृद्धी करण्यास सहकार्य करणाऱ्यांना पाणीपट्टीत २५ टक्के, तर घरपट्टीत १० टक्के सूट देण्याची घोषणा शिवण बु.चे सरपंच दवंडे यांनी या कार्यक्रमात केली. त्यांच्या घोषणेनुसार गाव समृद्ध करण्यासाठी आम्ही सर्व तयार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
===Photopath===
050121\05wsm_2_05012021_35.jpg
===Caption===
शिवण येथे समृद्ध गाव स्पर्धेच्या कामांचा आढावा