वाशिम : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त ‘जय ज्योती जय क्रांती’चा जयघोष करत वाशिम शहरातून निघालेल्या शोभायात्रेने शहर दणाणून गेले होते. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. जयंतीदरम्यान शाहीरी पोवाडे, रक्तदान शिबिर व स्पर्धा परिक्षा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम पार पडला. महात्मा फुले यांच्या पुतळ्याला व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा साकारली होती. २४ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षेतील गुणवंत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सायकल स्पर्धेत विजयी झालेल्या अलका गिºहे व छाया मडके यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत विद्यार्थीनी शोभायात्रेच्या रथात विराजमान झाल्या. यावेळी आराध्या विशाल भांदुर्गे या चिमुकलीने ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री प्रयोगातून सावित्रीबाईंचे जीवनचरित्र विषद केले. यानंतर ही पायदळ शोभायात्रा महात्मा फुले चौकातुन मार्गस्थ होवून देवपेठ, बालु चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावित्रीबाई फुले चौक, दंडे चौक, गणेशपेठ, टिळक चौक मार्गे जावून महात्मा फुले चौकात या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी उत्सव समितीच्या अध्यक्षा करुणा कल्ले यांनी मार्गदर्शन केले. शोभायात्रेदरम्यान विर लहुजी चौक येथे अ.भा. माळी महासंघ जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे यांच्या हस्ते विर लहु सेनेच्या शाखा नामफलकाचे अनावरण करण्यात आले. शोभायात्रेमध्ये मारवाडी युवा मंचच्या वतीने शरबत वाटप तर लहु सेनेच्या वतीने चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रास्ताविक माळी युवा मंच जिल्हाध्यक्ष नागेश काळे यांनी तर संचालन सावित्री महिला मंचच्या जिल्हाध्यक्षा किरण गिºहे यांनी केले. आभार गणेश जेठे यांनी मानले. या शोभायात्रेत शहरातील विविध समाज घटकातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. जयंती महोत्सव, विविध कार्यक्रम व शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, विविध सामाजीक संघटना व नागरीकांनी परिश्रम घेतले.