संतोष वानखडे, वाशिम: ऑटोमध्ये प्रवाशी घेउन जाताना चालकाचे लक्ष विचलित झाल्याने समोरच्या ट्रकला ऑटो धडकल्याची घटना १३ डिसेंबरला कारंजा शहरालगतच्या सावरकर चौकात घडली. यामध्ये ऑटो चालकासह १० प्रवाशी जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार एम. एच .३७ जी. २१२५ क्रमांकाचा ऑटो ९ प्रवासी घेऊन काकडशिवनीवरून कारंजाकडे येत असताना नागपूर ते छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील सावरकर चौकात चालकाचे लक्ष विचलित झाल्याने प्रवाशी ऑटो ट्रकला धडकला. त्यामध्ये ऑटो चालकासह निकिता गोपाल मालवे , प्रिया संतोष जाधव , मीना राम राऊत, मंदा पुरुषोत्तम घोडेसार, पुरुषोत्तम रामचंद्र घोडेसार ,नंदिनी सुमेध राजूरवाडे ,अजय शिरसाट ,राणी दिलीप भोसले ,पायल सुरेश राजुरवाडे व प्रतीक्षा मनोहर राठोड हे प्रवाशी जखमी झाले असून, ते कारंजा तालुक्यातील काकडशिवनी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे रुग्णवाहिका चालक विनोद सोनवणे यांनी जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारानंतर यातील काही जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला.काही प्रवासी स्वइच्छेने उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल झाले. दरम्यान कारंजा शहर पोलिसांनी अपघाताच्या घटनेची दखल घेतली असून अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलीस स्टेशन आवारात लावली.