लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुळे यंदा आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियाही प्रभावित होत आहे. दरम्यान, लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या जिल्ह्यातील बालकांना ३१ आॅगस्टपर्यंत संबंधित शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. ३१ आॅगस्टपर्यंत प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत तर या बालकांना मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. ३१ आॅगस्टनंतर रिक्त जागा पाहून प्रतिक्षा यादीतील बालकांना शिक्षण विभागाच्यावतीने स्वतंत्र सूचना दिल्या जाणार आहेत.आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे मोफत प्रवेश प्रक्रियादेखील प्रभावित झाली आहे. मार्च महिन्यात पुणे येथे पहिली लॉटरी काढण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ९७६ बालकांची निवड झाली. आरटीई अंतर्गत जिल्ह्यात १०१ शाळांची नोंदणी झाली असून, १०११ जागा या मोफत प्रवेशासाठी राखीव आहेत. यासाठी २२५६ अर्ज आॅनलाईन पद्धतीने प्राप्त झाले. पहिल्या लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी ३१ आॅगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९७६ पैकी आतापर्यंत ५७३ बालकांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरीत ४०३ बालकांचे अद्याप प्रवेश झाले नाहीत. मोफत प्रवेशापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून यंदा शाळा स्तरावरच बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे किंवा बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांना शाळेशी संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शाळेच्या व्हॉटस् अॅप क्रमांकावर किंवा ई-मेल, अन्य सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे बालकांच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करून पालकांना आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करता येणार आहे. ३१ आॅगस्टपर्यंत संबंधित बालकाच्या पालकांनी संबंधित शाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले.
३१ आॅगस्टनंतर स्वतंत्र सूचना मिळणारजिल्ह्यात १०११ जागा या मोफत प्रवेशासाठी राखीव आहेत. पहिल्या लॉटरी पद्धतीत ९७६ बालकांची निवड झाली. अजून ४०४ बालकांचे प्रवेश बाकी आहेत. ३१ आॅगस्ट ही अंतिम मुदत असल्याने यानंतर रिक्त राहणाऱ्या जागेवर प्रतीक्षा यादीतील बालकांना संधी दिली जाणार की, प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळणार, हे अद्याप अनिश्चित आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी प्रवेशाकरीता सध्या शाळेत जाऊ नये, त्यांच्याकरीता आरटीई संकेतस्थळावर स्वतंत्र सूचना ३१ आॅगस्टनंतर दिल्या जाणार आहेत, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.