लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत खासगी प्राथमिक शाळेत मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या ९७६ बालकांपैकी केवळ १३१ बालकांचे प्रवेश १२ जुलैपर्यंत झाले आहेत. यावर्षी शाळा स्तरावरच कागदपत्रांची पडताळणी असूनही यासाठी पालक येत असल्याचे दिसून येत आहे. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आल्याने तेव्हापासून शाळांना सुट्या आहेत. यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही कोरोनामुळे ३१ जुलैपर्यंत वर्ग सुरू होणार नाहीत. तथापि, प्रवेश प्रक्रिया व अन्य प्रशासकीय कामकाज सुरू आहे. आरटीई अंतर्गत जिल्ह्यात १०१ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, एकूण प्रवेशित जागा १०११ आहेत. यासाठी २२५६ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीतून एकूण ९७६ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. प्रवेश घेण्यासाठी यावर्षी संबंधित शाळा स्तरावरच आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया असून, त्यानंतर प्रवेश दिला जात आहे. निवड झालेल्या बालकांच्या मोबाईलवर १५ दिवसांपूर्वीच संदेशही पाठविण्यात आले. १२ जुलैपर्यंत केवळ १३१ बालकांचे मोफत प्रवेश होऊ शकले. (प्रतिनिधी)
Right To Education : ९७६ पैकी केवळ १३१ बालकांचे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 3:57 PM