लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सोयाबीन तेलाचे दर १२५ रुपये प्रती किलोवर पोहोचल्याने उपहारगृह चालकांची पंचाईत झाली आहे. या दरवाढीची कसर काढण्यासाठी फराळाच्या पदार्थांचे दर दीडपट केल्याने आता ग्राहकांनी उपाहारगृहांकडे पाठ केली आहे. तेलाच्या दरवाढीमुळे पूर्वीच्या दरात फराळाचे पदार्थ विकणे परवडणारे राहिले नाही, तर पदार्थांमधील दरवाढीने ग्राहक फिरकेनासे झाल्यामुळे उपाहारगृह चालक संकटात सापडले आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून अन्नधान्यासह तेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. यामुळे सर्वसाधारण जनता त्रस्त असताना उपाहारगृह चालकही या दरवाढीमुळे अडचणीत आले आहेत. प्रामुख्याने हरभरा डाळ, मूग डाळीसह शेंगदाणा, साबूदाणा, मैदा, आदिंसह सोयाबीन, शेंगदाणा तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या अन्नधान्यापासून तयार केल्या जाणाºया पदार्थांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे उपाहारगृह चालकांनी मुंगवडा, समोसा, कचोरी, भजे, आलूवड्यासह साबूदाणा वडा, जिलेबी आणि फरसानाच्या दरात वाढ केली आहे. फरसान आणि जिलेबी वगळता इतर पदार्थांचे दर दीडपट वाढविल्यामुळे ग्राहकांनी आता उपाहारगृहातील नाश्त्याकडे पाठ केल्याचे दिसत आहे. यामुळे उपहारगृह चालक पुरते संकटात सापडले आहेत. अन्नधान्य आणि तेलदरवाढीमुळे त्यांची स्थिती इकडे आड तिकडे विहिर अशी झाली आहे. उपाहारगृहातील पदार्थांचे तुलनात्मक दरपदार्थ पूर्वीचे आताचे समोसा १ नग १० रुपये १५ रुपयेकचोरी १ नग १० रुपये १५ रुपयेआलूवडा १० रुपये १५ रुपयेमुंंगवडा १० रुपये १५ रुपयेभजे ५० गॅ्रम १० रुपये १५ रुपयेमिसळ १ प्लेट १५ रुपये २० रुपये
उपाहागृहातील पदार्थ तयार करण्यासाठी लागणाºया कच्च्या मालाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंग डाळ, हरभरा डाळ, मैदा, साबूदाणा, शेंगदाण्यासह तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने फराळाच्या पदार्थांचा खर्च वाढला आहे. त्यात आता ग्राहकांची संख्या घटत असल्याने आमचा व्यवसायच संकटात सापडला आहे.-पुनम बिष्णोई, उपाहारगृह चालक