कारंजा तालुक्याच्या आरोग्य अधिकारी, नोडल अधीकारी, तालुका गटविकास अधिकारी,नायब तहसीलदार, गावचे प्रशासक, आरोग्य कर्मचारी, ग्रामसचिव, जि. प. आजी माजी सदस्य, पं. स. सदस्य, पोलीस पाटील समाजसेवी आदींची सभा ग्रामपंचायत भवन, काजळेश्वर येथे मंगळवारी (दि. २०) पार पडली. सभेत कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कोरोनाचे थैमान सुरू असताना त्यातून ग्रामीण भागही मोठया प्रमाणात बाधित होताना दिसत आहे. ह्यातच काजळेश्वर येथे दररोजच कोरोना रुग्ण समोर येत असल्याने गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक संयुक्त
कृती समितीची सभा घेऊन कार्यवाही करण्याचे दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव, गटविकास अधिकारी कालिदास तापी, नायब तहसीलदार जाधव, नोडल अधिकारी डॉ. प्रशांत वाघमारे, ग्रामपंचायत प्रशासक पुंडलिकराव देशमुख, ग्रामसचिव सतीश वरघट, जि.प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यात गर्दीचे ठिकाण बँक, कंटेनमेन्ट झोन क्षेत्र तसेच समाजमंदिर इत्यादी ठिकाणी कोरोना चाचणी शिबिर आयोजित करून चाचण्या वाढविणे, लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे याकरिता ग्रामवासीयांचा यात सहभाग वाढविणे, व्यवसायी, ऑटोचालक, रेशन तसेच दुकानदार यांच्या अद्ययावत चाचण्या करणे यासह विविध विषयांवर चर्चा झाली. सभेला पं. स. सदस्य रंगराव धुर्वे, माजी जि. प. सदस्य
ज्योतीताई गणेशपुरे,पोपा. शीतल सचिन हाते, डॉ. रामहरी मुंदे, आरोग्य कर्मचारी समाजसेवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. आरोग्य कर्मचारी संदीप खुळे, कैलास आध्ये, योगीता वानखडे, मंजू जाधव यांच्यासह अंगणवाडी, आशा बचत गटाच्या महिला आरोग्य विभाग, शालेय कर्मचाऱ्यांचे योगदान मिळत असल्याचे प्रशासक पुंडलिकराव देशमुख यांनी सांगितले.