वाशिम - पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील अडथळा दूर झाला असून, रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीनंतर आता जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याच्या कामाला गती मिळाल्याची माहिती आहे. बाळखेड, धोडप व किनखेडा येथे बॅरेजेस व्हावे याकरिता मागील २ वर्षापासुन आमदार राजेंद्र पाटणी, तत्कालिन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर हे शासनस्तरावर पाठपुरावा करीत होते. एका वर्षापूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे लखनसिंग ठाकुर यांच्या निवासस्थानी आले असताना, शेतकºयांसह ठाकूर यांनी या बॅरेजसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची साद घातली होती. योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जलसंपदाच्या प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात आला. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास दिरंगाई होत असल्याने मध्यंतरी प्रशासकीय कार्यवाही ठप्प होती. यासंदर्भात आमदार पाटणी यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला तसेच लखनसिंह ठाकूर यांनी शिष्टमंडळासह १५ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन चर्चा केली. ना. गडकरी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर, २८ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या दालनात आमदार राजेंद्र पाटणी, लखनसिंह ठाकुर तसेच जलसंपदा विभागाचे मुुख्य अभियंता व पाटबंधारे अधिकाºयांसोबत चर्चा झाली. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश ना. महाजन यांनी दिले. या बॅरेजेसच्या अनुषंगाने प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याने बॅरेजसंदर्भात आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.