लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत दर गुरूवारी हळदीची आवक वाढत असल्याने आता येत्या सोमवार, ६ जुलैपासून दर आठवड्यातील सोमवार व गुरूवार अशा दोन दिवशी हळद खरेदी करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने ४ जुलै रोजी घेतला.रिसोड तालुक्यासह जिल्ह्यात गत दोन, तीन वर्षापासून हळदीची लागवड केली जात आहे. शेतकºयांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून रिसोड बाजार समितीत दर गुरूवारी हळद खरेदी केली जाते. गत १५ दिवसापासून हळदीचे भाव वधारले असल्याने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात हळद आणली जात आहे. साधारणत: दिवसांपूर्वी ३ ते ४ हजार क्विंटलच्या आसपास हळद आवक येत होती. गुरूवार, २ जुलै रोजी १० हजार क्विंटलपर्यंत हळदची आवक गेली होती. जिल्ह्यातील शेतकºयांप्रमाणेच मराठवाडा व परजिल्ह्यातील शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणत असल्याने आठवड्यातील एक दिवस हळद खरेदीसाठी कमी पडत आहे. या पृष्ठभूमीवर माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बाजार समितीचे सभापती तथा सचिव यांची तातडीची बैठक घेऊन हळद खरेदी यापुढे आठवड्यातील दोन दिवस सुरू ठेवा अशा सूचना केल्या. सभापती सुमन भुतेकर आणि सचिव विजय देशमुख यांनी यापुढे आठवड्यातील दर सोमवार आणि गुरूवार या दोन दिवशी हळद खरेदी केली जाईल, असा निर्णय घेतला. या निर्णयाला व्यापारी, अडत्यांचीही संमती मिळाली.
रिसोड बाजार समितीत आता आठवड्यातून दोन वेळा हळद खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:22 PM