लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील १० प्रभागांमधील २० नगर सेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी रविवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २१.१८ टक्के मतदान झाले.नगर परिषद सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने ही निवडणूक होत आहे. थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड होणार असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. शहरातील १० शाळांवरील ३५ बुथवर १२० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिसांचा ताफाही ठेवण्यात आला आहे. रिसोड नगर परिषदेच्या १० प्रभागांमधून होत असलेल्या या निवडणूकीत २४ हजार ५७० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १२ हजार ७९० पुरूष; तर ११ हजार ७८० स्त्री मतदारांचा समावेश आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २१.१८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत खासदार भावना गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, माजी आमदार विजय जाधव आदींची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. निवडणुकीत कोण बाजी मारतो, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
रिसोड नगर परिषद निवडणुक; चार तासांत २१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:31 PM