रिसोड: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अडोळ धरणात अल्प जलसाठा उरला असून, नागरिकांना पावसाळ्यापर्यंत व्यवस्थीत पाणी पुरवठा करण्यासाठी रिसोड पालिकेने नियोजन केले आहे. या अंतर्गत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात येत असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत रिसोड तालुक्यात बºयापैकी पाऊस गतवर्षी पडला; परंतु सिंचनासाठी झालेला वारेमाप उपसा, पाण्याचा सतत होणारा अपव्यय आणि रखरखत्या उन्हामुळे होत असलेल्या बाष्पीभवनामुळे तालुक्यातील प्रकल्पही तळ गाठू लागले आहेत. त्यातच शहराला पाणी पुरवठा होणाºया अडोळ धरणातही केव्ळ २० टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न टाळल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शहरात सद्यस्थितीत नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, वापराचे पाणी भरल्यानंतर घरासमोरी आवार स्वच्छ करणे, वाहने धुणे, नळाचे पाणी थेट शौचालय, स्रानगृहात सोडणे, नाल्या साफ करणे, हे प्रकार नागरिकांद्वारे सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होऊन धरणातील साठा झपाट्याने कमी होत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अपव्यय करणाºया नागरिकांवर कारवाई करण्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ठरविले आहे. यासाठी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार पाणी भरल्यानंतर नळाची तोटी काळजीपूर्वक बंद करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. त्यानंतरही कोणी पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता शहरात पाण्याचा अपव्यय करणाºयांवर कठोर कारवाई करण्याचे ठरविण्यात आले आहे. सातत्याने होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीच ही कारवाई करणे नगर पालिकेला अनिवार्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे.
-अलंकार खैरे, पाणी पुरवठा सभापती, नगर पालिका रिसोड