आरोग्य विभागाकडून रिसोड शहरात ग्रामीण रुग्णालय, तर ग्रामीण भागात मोप, कवठा, केनवड आणि मांगूळझनक येथे शासकीय लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी गेल्या काही दिवसांत २६ हजार ३४९ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य कर्मचारी ९८८, फ्रंटलाइन वर्कर १४५५, ज्येष्ठ नागरिक १२ हजार ५०९, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील १० हजार ४७५ आणि १८ ते ४४ वयोगटातील ९३० नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या अनेकांच्या दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेल्यानंतरही त्यांना लस मिळणे दुरापास्त झाले होते. यासंबंधी ‘लोकमत’ने ११ मे रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करून दुसऱ्या डोससाठी नागरिकांची होणारी गैरसोय चव्हाट्यावर आणली. त्याची तडकाफडकी दखल घेत आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील चार लसीकरण केंद्रांसाठी कोव्हॅक्सिनचे ४०० डोस, कोविशिल्डचे ४०० डोस उपलब्ध करून दिले, तसेच शहरी भागासाठी कोविशिल्ड लसीचे ५०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
......................
कोट :
मध्यंतरी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागली. आता मात्र लस उपलब्ध झाली आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर टाकून आधी दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.
- डाॅ. पी.एन. फोफसे
तालुका आरोग्य अधिकारी, रिसोड.