लोकमत न्यूज नेटवर्करिसोड - मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रिसोड शहरात धो-धो पाऊस झाला. ६ जूनच्या रात्रीदेखील रिसोड तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.७ जून रोजी मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. यावर्षी वेळेवर मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा मान्सून लांबनीवर जाण्याचा अंदाज वर्तविला. हवामान खात्याचा सुरूवातीचा अंदाज खरा ठरवित मान्सूनने रिसोड येथे पहिल्याच दिवशी दमदार हजेरी लावली. दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे रस्ते जलमय झाले. सुमारे ३५ मिनिटे पाऊस कोसळला. १ ते ७ जून दरम्यान, रिसोड तालुक्यात ३६.६८ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात १ ते ७ जून दरम्यान १२२ मीमी पाऊस झाल्याची नोंद तालुका प्रशासनाच्या दप्तरी आहे. रिसोड तालुक्याने सध्या पावसाची सरासरी ओलांडली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.