लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील शेकडो गावांसाठी लाभदायक ठरणाºया मडाण आणि अडाण या नद्यांचे खोलीकरण सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ शनिवारी मानोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या नद्यांच्या खोलीकरणामुळे तालुक्यातील शेकडो गावांतील पाणीसमस्या मिटण्यास मदत होणार आहे.मंगरुळपीर तालुक्यातील जवळपास ३० गावांतून वाहणारी मडाण नदी गेल्या काही वर्षांत दुर्लक्षीत झाल्याने बुजली होती. त्यामुळे कधीकाळी जलसंपन्न असलेल्या या नदीकाठच्या गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊन शेती उत्पादनावरही प्रचंड परिणाम झाला. आता राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानातून या नदीचे खोलीकरण होत आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी असलेली आणि मंगरुळपीर तालुक्यातून वाहणाºया अडाण नदीचे पात्रही बुजत चालले आहे. त्यामुळे जलपातळीवर परिणाम झाला आहे. या नदीचेही खोलीकरण सुजलाम, सुफलाम अभियानातून करण्यात येत आहे. या कामाचा प्रारंभ शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मानोली येथे करण्यात आला. यावेळी आमदार लखन मलिक, माजी जि.प. सभापती लक्ष्मीकांत महाकाळ, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी सोळंके, तसेच भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सुजलाम, सुफलाम अंतर्गत मंगरुळपीर येथे नदीखोलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 6:29 PM