वाशिम, दि. ३0- जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्प क्षेत्रातील बुडीत क्षेत्रामुळे बाधित होणारे रस्ते व पुलांची कामे गेल्या सहा वर्षांंंपासून प्रलंबित आहेत. यासाठी लागणारा ५.२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जलसंपदा विभागाने अदा केल्यानंतरही बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न रेंगाळल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.गोंडेगाव लघुपाटबंधारे योजनेच्या कार्यक्षेत्रात उमरी-शेंदोणा रस्ता कामासाठी जलसंपदा विभागाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे सन २0१२ मध्ये ६६ लाख रुपये रकमेचा भरणा केला आहे; मात्र अद्याप या कामास प्रारंभ झालेला नाही. गायवळ लघुपाटबंधारे संग्राहक योजना कार्यक्षेत्रात वाशिम-कारंजा राज्यमार्गावरील पुलासाठी ३0 डिसेंबर २0११ रोजी १३५.६0 लाख रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले; मात्र नदीच्या विसर्गानुसार अपेक्षेपेक्षा अधिक गाळे ठेवण्यात आल्याने त्यास आक्षेप घेण्यात आला. या प्रकल्पाला जून २0१५ मध्ये १२.0९ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यात पुलासाठी १.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली; मात्र तेवढय़ा निधीत हे काम होणार नसल्याने पुन्हा शासनाकडून ह्यसुप्रमाह्ण घ्यावी लागणार असल्याने हा प्रश्न निकाली निघालेला नाही.स्वासीन लघुपाटबंधारे योजना कार्यकक्षेतील कवठळ ते कुपटा या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाटबंधारे विभागाने २३ जानेवारी २0१५ रोजी १ कोटी ६२ लाख ४३ हजार रुपयांचा भरणा केला; मात्र कामास अद्याप प्रारंभ झालेला नाही. उकळी बॅरेज कार्यकक्षेतील राजगाव ते अनसिंग रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी १.३७ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला. या कामास डिसेंबर २0१५ ला कार्यारंभ आदेश देऊन जून २0१६ पर्यंंंत काम पूर्ण करण्याची ग्वाही बांधकाम विभागाने दिली होती; मात्र हे काम अद्याप प्रलंबित आहे. चाकातिर्थ लघुपाटबंधारे संग्राहक योजनेमुळे नागपूर ते औरंगाबाद राज्य मार्गावरील सबमर्सीबल पूल बाधित होत आहे. बांधकाम विभागाने पुलाची उंची वाढविल्यास चाकातिर्थ धरणात पूर्ण साठा करणे शक्य होईल. पर्यायाने मालेगावला पुरेसा पाणीपुरवठा करता येईल, असे जलसंपदाने शासनाला कळविले आहे. वारा लघुपाटबंधारे योजनेच्या बुडीत क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गावरील जांभरुण ते बोरी बु. या रस्त्यावरील पुलाची उंची वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंपदाने १.१७ कोटी रुपयाचा निधीही उपलब्ध करुन दिला; मात्र त्या कामासही अद्याप प्रारंभ झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
प्रकल्प परिसरातील रस्ते, पुलांची कामे प्रलंबित!
By admin | Published: January 31, 2017 2:45 AM