लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : मानोरा बस स्थानक ते प्रमुख मार्ग या दरम्यान रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत मुरूम टाकल्याने पावसामुळे हा रस्ता चिखलमय झाला आहे. परिणामी, नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. मानोरा बस स्थानक ते जामदरा या दरम्यानच्या १८ किमी अंतराच्या रस्त्याच्या दर्जोन्नतीचे काम ‘डब्ल्युएएस ३४’ या पॅकेजअंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहे. यातील मानोरा बसस्थानक ते गावापर्यंतच्या रस्त्याचे काम सद्यस्थितीत सुरू असुन गिट्टीच्या रस्त्यावर मातीमिश्रीत मुरूमाचा वापर करण्यात येत आहे. रिमरिझ पावसामुळे या भागात चिखल झाला असून, त्यावरुन वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गत दोन, तीन दिवसात दोन वाहनधारक येथे दुचाकीवरून पडल्याने किरकोळ दुखापतही झाली. रस्त्यावरुन पायदळ चालणारे सुध्दा चिखलावरुन घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याच रस्त्यावरुन जनुना, चोंढी, धामणगाव देव येथे जाणारे सर्व दुचाकी, तीनचाकी, अन्य वाहनांची ये जा असते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.
मानोऱ्यातील रस्ता चिखलमय; नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 6:24 PM