- यशवंत हिवराळेलोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : संत नगरी शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण आहे. सुकांडा गावा नजीक रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी नाल्यावर खोदण्यात आलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना सुरक्षा कठडेच नसल्याने हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा धोकादायक ठरत आहे. श्री क्षेत्र संत नगरी शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. काम पूर्णत्वाचा कालावधी संपल्यानंतरही अद्यापही काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालक तथा पादचाऱ्यांसह शेतकरी बांधवांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. तीन वर्षाच्या कालावधीत मेडशी ते नाथनगरी श्री.क्षेत्र डव्हा या अकरा कि.मी. अंतराचे रस्त्यावर संबंधित ठेकेदाराकडून केवळ दगड मुरुमांचा भरावाच टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सद्य:स्थितीत या रस्त्यावर चिखल, पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यावरून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे अपेक्षीत आहे.
पुलावर सुरक्षा कठडे नाहीत!ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले. या खड्ड्यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कठडे उभारण्यात आले नाहीत. पुलाच्या कामानजीक वाहनांसाठी वळण रस्ताच बनवण्यात आला नसल्याने वाहनधारकांना रस्त्याच्याकडेवरुन चिखलातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते. अनेकांची वाहने फसत आहेत. पुलाचे कामासाठी नाल्यावर खोदण्यात आलेले मुरूम व दगड व्यवस्थित न टाकल्याने नाल्यामध्ये पुराचे पाणी साचून शेतात शिरले आहे.
मेडशी ते डव्हा या पालखी रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत अनेकदा लेखी निवेदन दिले. परंतु त्याकडे संबंधितांकडुन दुर्लक्ष करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत या रस्त्यावर फुलांसाठी खोदून ठेवलेले खड्डे धोकादायक ठरत आहेत. - कैलासराव घुगे, सरपंच सुकांडा