या रस्त्यावरून वाहने घसरून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जि.प. बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असताना, याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना व वाहन चालकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
मालेगाव-रिसोड या राज्य मार्गापासून रिसोड तालुक्यातील दापुरी ते वाघी खुर्द या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी गिट्टी उघडी पडली आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखल पसरला असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने या रस्त्यावर चिखल होऊन तिथे वाहने घसरतात. परिणामी, लहान-मोठ्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे, वाघी खुर्द ते गोवर्धन हा पाच किलोमीटरचा रस्ता पूर्णतः उखडला असून, गिट्टी उघडी पडल्यामुळे पादचारी व वाहनधारकांना चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाघी खुर्द येथील राहिवाशांना दवाखाना, खते-बी बियाणे खरेदीसाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हाच रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागातील आमदार, जि.प. परिषद सदस्य, पं.स. सदस्य आदी लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून, दापुरी-वाघी खुर्द-गोवर्धन या मुख्य रस्त्याची तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करावी व या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.