रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान वेळोवेळी चौकसभा घेणे, जनजागृतीपर बॅनर लावणे, वाहनचालकांसाठी प्रबोधनपर कार्यशाळा घेणे, एस.टी.मधून कायमस्वरूपी फिरते प्रदर्शन आयोजित करणे, प्रवासी मार्गदर्शक फलक लावणे, रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजना, खड्डे दुरुस्ती, साईन बोर्ड व माहिती फलक असे अनेक उपक्रम राबविले जाणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी शासनाने त्या-त्या विभागांकडे सोपविलेली आहे. परंतु, पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग वगळता नगरपालिका, आरोग्य विभाग, एस.टी. परिवहन, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळ आदी यंत्रणांकडून अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे अभियान अपयशी ठरत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने २१ जानेवारीच्या अंकात ‘सुरक्षा सप्ताह नावापुरता; रस्ते असुरक्षितच’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत बहुतांश यंत्रणांनी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
रस्ता सुरक्षेची युद्धस्तरावर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:41 AM