वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक वनविभागाचे क्षेत्र लक्षणीय आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून या जंगलात निलगाय, हरिण, माकडे, कोल्ह्यांसह इतर प्राण्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. तथापि, जंगलातील जलस्त्रोतांत मुबलक प्रमाणात पाणी नसल्याने आणि उन्हाळ्यापूर्वीच बहुतेक पाणवठे कोरडे पडत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधासाठी शेतशिवार आणि लोकवस्तीत प्रवेश करतात. यातून मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होऊन वन्यप्राणी त्यात बळी पडत आहेतच. शिवाय, हे प्राणी रस्ता ओलांडत असताना अचानक वाहनांसमोर येत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. अनेकदा प्रामुख्याने वन्यप्राण्यांचाच मृत्यू यात होत असला तरी दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनचालकांनाही या अपघातात जीव गमावावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्याच्या नादात मोठ्या मालवाहू वाहनांचे अपघातही घडून चालकांचा जीव धोक्यात येत आहे.
-----------
महिनाभरात आठ अपघात
वाशिम जिल्ह्यात विविध मार्गावर वन्यप्राणी रस्ता ओलांडत असताना वाहनांसमोर आल्याने महिनाभरात आठहून अधिक अपघात घडले आहेत. त्यात निलगाय, माकड, रानडुक्कर आदी प्राण्यांचा बळी गेला आहे. मंगरूळपीर-अकोला, धानोरा-शेंदूरजना, मंगरूळपीर-मानोरा, वाशिम-मंगरूळपीर या मार्गांवर हे अपघात घडले आहेत.
-------------
कोट: जिल्ह्यात रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्यप्राण्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी त्या प्राण्यावर पशुचिकित्सकांकडून उपचार करून घेतात. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या अपघातात इसमाचा मृत्यू झाल्यास शासनाकडून मदत दिली जाते.
-सुमंत सोळंके,
उपवनसंरक्षक,
वनविभाग (प्रादेशिक) वाशिम