वाशिम: शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर-संभाजीनगर महामार्गावर दोनद बु. फाट्यानजिक शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. सोयाबीनला किमान ८ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना पीकविम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी, यलो मोझॅकमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करण्यात यावा, खरीप २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत करण्यात यावी, आदि मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर-संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी दुपारी रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते दामू अण्णा इंगोले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत ठाकरे. तालुकाध्यक्ष हर्षद पारे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.