आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, दिल्ली यासह इतरही राज्यांमध्ये वाशिममार्गे ये-जा करणाऱ्या रेल्वेंची संख्या गेल्या काही वर्षांत वाढलेली आहे. यामुळे दिवसभरातून अनेकवेळा रेल्वेगेट बंद करावे लागते. परिणामी, वाशिमवरून पुसद, अमरावतीकडे आणि विरूद्ध दिशेने येत असलेल्या वाहनांना तासन्तास जागीच उभे राहावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी २०१७ मध्ये उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, विविध स्वरुपातील अडचणींमुळे चार वर्षांतही ते काम अर्धवट अवस्थेत रखडलेले आहे. यामुळे समस्या अद्याप ‘जैसे थे’ असून, उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंनी असलेले रस्तेही कच्च्या स्वरूपातील असल्याने वाहतूक वारंवार प्रभावित होत आहे. विशेषत: पावसाळ्यात यामुळे वाहनचालकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरवून किमान रस्त्यांचा प्रश्न तरी मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
...................
बाॅक्स :
खासदार गवळी यांचे बांधकाम विभागाला पत्र
वाशिम ते पुसद या रस्त्यावर शहरातील आययूडीपी कॉलनी, पंचशील नगर, हॅपी फेसेस स्कूल, मानमोठेनगर, कानडे स्कूल, रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल, चर्च वसलेले आहे. यासह रस्त्याची नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली आहे. त्यामुळे या रस्त्याने दैनंदिन मोठ्या प्रमाणात कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, पुसद व ग्रामीण भागातून वाशिममध्ये वाहतूक सुरू असते. ग्रामीण भागातून वाशिममध्ये रुग्णवाहिकेद्वारे गंभीर आजारातील रुग्ण आणले जातात. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याला खड्डे पडल्याने सर्वांचीच गैरसोय होत आहे. दमदार पावसाला सुरूवात होण्यापूर्वी पॅच मारून तथा खड्डे बुजवून रस्ते तयार करावेत, अशी सूचना खासदार भावना गवळी यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राव्दारे दिली आहे.