खरिपात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा
दगडउमरा : यंदाच्या खरीप हंगामात मूग, उडीद, ज्वारी या पिकांच्या पेरणी क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. त्या तुलनेत सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला असून, अनुकूल वातावरणामुळे हे पीक सध्या चांगलेच बहरले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
शेतकरी गटाला अनुदानाची मागणी
काजळेश्वर: शासनाच्या ‘उन्नत शेती समृद्ध शेती’ या घोषणेनुसार शेती व्यवसाय करण्यास मदत व्हावी, म्हणून शासनाने काजळेश्वर येथील बळीराजा स्वयंसहायता शेतकरी गटास अनुदान द्यावे, अशी मागणी येथील शेतकरी एस.पी. उपाध्ये यांनी शुक्रवारी केली आहे.
स्वच्छतेबाबत जनजागृती
वाशिम : ग्रामपंचायतकडून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, या अंतर्गत सोमवारी गावात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. आठवडाभरापासून हा उपक्रम राबविला जात आहे.
आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्या प्रलंबित!
वाशिम : आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या दरमहा मानधनात वाढ करावी, यासह इतर मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आशा सेविकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली.
उड्डाणपुलाखालील नाल्यांची सफाई
वाशिम : जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे निर्माणाधीन उड्डाणपुलालगतच्या मार्गावर पाणी साचून चिखल होत आहे. याचा वाहनचालकांना मोठा त्रास होत असल्याने, गेल्या चार दिवसांपासून मार्गालगतच्या नाल्यांची साफसफाई कंत्राटदाराने मजुरांमार्फत सुरू केली आहे.
वाशिम-पुसद मार्गावर वाहतूक कोंडी
वाशिम : वाशिम-पुसद महामार्गावरील केंद्रीय वखार महामहामंडळाच्या गुदामात धान्य घेऊन येणाऱ्या वाहनांची पुसद-वाशिम महामार्गावरील दगड उमरा फाट्यानजीक मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा शेतकरी व ग्रामस्थांना त्रास होत असून, यातून एखादवेळी अपघाताची शक्यता असल्याने वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
जामदरा प्रकल्पाची दुरुस्ती प्रलंबित
वाशिम: मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथे प्रकल्पाच्या गेटमधून पाणी वाहून जाते. त्यामुळे हा प्रकल्प उन्हाळ्यापूर्वीच आटतो. दोन वर्षांपासून दुरुस्तीच न केल्याने हा प्रकार घडला असून, अद्यापही या प्रकल्पाची दुरुस्ती झालेली नाही.
आसेगावात निर्जंतुकीकरण
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि पावसाळ्यात पसरणारी घाण लक्षात घेता शेंदुरजना आढाव ग्रामपंचायतीने गावात निर्जंतुकीकरण मोहीम सुरू केली. या अंतर्गत गावात जंतुनाशक औषध फवारण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम: सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून कारंजा तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी अनेकांनी यांचा लाभ घेतला.