लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा : अकोला येथील खाजगी कामे आटोपून १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता किन्हीराजा येथील दुरसंचार विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी बद्रीनाथ रतनसींग आडे हे अकोला ते मंगरुळपीर या बसने येत असताना, अज्ञात इसमांनी त्यांना गुंगीच्या औषधीचा वास दिला आणि ७० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.बद्रीनाथ रतनसींग आडे हे अकोला येथील खाजगी काम आटोपून मंगरुळपीर आगाराच्या एम एच ०६ एस ८०४८ या अकोला ते मंगरुळपीर बसमध्ये बसले होते. यावेळी त्यांनी मुलगा विश्वनाथ आडे याला फोन करून शेलुबाजार येथे साडेपाच वाजेच्या सुमारास येण्यास सांगितले. सायंकाळचे ७ वाजले तरी वडीलांचा फोन का येत नाही व वडील फोन का उचलत नाही, यामुळे मुलाची चिंता वाढली. मुलाने मंगरूळपीर येथील वर्कशॉपमध्ये लावण्यात आलेल्या बसची साफसफाई करणाऱ्या कर्मचाºयाशी फोनद्वारे संपर्क साधून माहिती दिली. वर्कशॉमध्ये असलेल्या एसटी बसमध्ये मागच्या सीटवर एक व्यक्ती झोपून असल्याचे सांगताच, विश्वनाथ आडे यांनी नातेवाईकांसह वर्कशॉप गाठले.यावेळी बद्रीनाथ आडे हे बेशुद्ध असल्याचे दिसून आले तसेच त्यांच्या पॅन्टच्या खिशातून रक्कम व सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे आढळून आले. आडे यांना वाशिम येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. शुक्रवारला २० डिसेंबरला बद्रीनाथ आडे यांना पुन्हा अकोला येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्या हातातील ७ ग्रॅमची एक व ५ ग्रॅमची एक अशा दोन सोन्याच्या अंगठ्या व नगदी दहा हजार रुपये असे एकून ७० हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार देणार असल्याचे बद्रीनाथ आडे व विश्वनाथ आडे यांनी सांगितले.(वार्ताहर)
गुंगीचे औषध देऊन बसमधील प्रवाशाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 1:46 PM