वाशिम : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एकजण फरार होण्यात यशस्वी झाला. शेलू खडसे (ता.रिसोड) मार्गावरील तलाव कट्ट्यावर १५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास रिसोड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, चार ते पाच संशयित वाहनाव्दारे दरोडा टाकण्यासाठी आल्याची गोपनिय माहिती रिसोड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता शेलू खडसे मार्गावरील तलाव कट्ट्यानजिक सापळा रचला. त्याठिकाणी मो. सरफराज (३८, मेहकर, जि.बुलढाणा), शेख चांद (४५, महात्मा फुले नगर, रिसोड), शेख सलीम (२१, बोरी, ता.मेहकर, जि.बुलढाणा) आणि आसिफ शेख भुरा (४२, बांद्रा पॉईंट, सुरत, गुजरात) हे चाैघे संशयास्पद स्थितीत आढळून आले.
संबंधितांकडून पोलिसांनी दरोड्यासाठी वापरण्यात येणारी दोरी, एअरगन, लोखंडी कट्टा, लोखंडी हातोडी, लोखंडी साखळी, स्क्रू ड्रायव्हर आदी वस्तू व एक टाटा सुमो वाहन जप्त केले. पोलीस उपनिरीक्षक उत्तम गायकवाड, रतन बावस्कर, संजय रंजवे, गणेश हाके, गणेश जाधव, संदीप खंदारे यांनी ही कारवाई केली. उत्तम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर भादंविचे कलम ५८०/२३, ३९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.