वाशिम : शहरातील महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोरून पायी जात असलेल्या एका ४८ वर्षीय इसमाला लुटणारी चाैघांची टोळी ‘एलसीबी’ने जेरबंद केली आहे. चाैघांवरही विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे अवघ्या ३६ तासांत या घटनेचा छडा लावण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, २२ जून रोजी वाशिम शहरातील सोईतकर रेडीमेड, पाटणी चौक, वाशिम येथे मजूरीचे काम करणाऱ्या एका ४८ वर्षीय मजुरास महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोरून रस्त्याने पायी जात असताना रात्री ९ वाजताच्या सुमारास चार युवकांनी मारहाण करत लुटले होते. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून वाशिम पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास कौशल्य पणाला लावून आरोपी निष्पन्न केले.
शहरातील खामगाव जीन आणि माहूरवेश परिसरातून प्रत्येकी दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच संबंधितांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व रोख रक्कम असा एकूण ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सोमनाथ जाधव, सपोनि अजिनाथ मोरे, पोना प्रशांत राजगुरू, ज्ञानदेव मात्रे, महेश वानखेडे, आशिष बिडवे, विठ्ठल महाले, दीपक घुगे, विठ्ठल सुर्वे यांनी पार पाडली.