वाशिम : मंदिरेही सुरक्षित नसल्याची बाब सुकांडा (ता.मालेगाव) येथील चोरीच्या दोन घटनांवरून समोर आली. सुकांडा येथील श्री संत गजानन महाराज संस्थान व शंभुशेष दरबार मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २ आक्टोंबर रोजी सकाळी ५:३० वाजता दरम्यान उघडकीस आली.
मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे सन २०१५ मध्ये ह.भ.प. सुनील महाराज पालवे यांच्या मार्गदर्शनात लोकसहभागातून लाखों रुपये खर्च करून गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेगाव-पंढरपुर पालखी मार्गावर श्री.संत गजानन महाराजांच्या भव्य मंदीराची निर्मिती केली होती. १ आक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान दैनंदिन आरती आटोपून मंदिराच्या पुजा-यासह भाविक घरी गेले. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात कोणीही नसल्याची संधी हेरून अज्ञात चोरट्यांनी रात्री ११:३० वाजता दरम्यान मंदिराच्या भिंतीवरुन उडी घेऊन आवारात प्रवेश केला आणि मुख्य प्रवेश द्वाराचे कुलुप तोडून मंदीरातील दानपेटी लंपास केली. सकाळी ५:३० वाजतादरम्यान पुजा-यासह काही भाविक दैनंदिन आरती साठी मंदिरावर आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. दानपेटी दर दोन महिन्यांनी ट्रस्टीसह गावातील भाविकांच्या समक्ष उघडण्यात येते.
यावेळी पेटीत पंचवीस ते तीस हजार रुपयांहून अधिकची देणगी जमा होत असल्याचे मंदिराचे पुजारी भास्करराव घुगे यांनी सांगितले. संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटीवर हात साफ केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा नजीकच्याच शंभुशेष दरबार मंदिराकडे वळवुन या मंदिरातील दान पेटी सुध्दा चोरून नेली. या पेटीत पाच ते सात हजार रुपयांहून अधिकची रक्कम असल्याचा अंदाज मंदीराचे पुजारी संतोष महाराज आंधळे यांनी व्यक्त केला. दोन्ही मंदीरातील दानपेट्या मधील जवळपास ३५ हजार रुपयांहून अधिकची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल गंधे, जमादार रामेश्वर राठोड,अनिल काळदाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.