वाशिम : उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागात काम उपलब्ध नसल्यामुळे मजुरांना कामासाठी मेट्रोसिटीत स्थलांतर करण्याची वेळ येते. गावातील मजुरांचे स्थलांतर थांबावे, त्यांना गावातच काम उपलब्ध व्हावे, यासाठी रोहयोतून काम दिले जाते. जिल्ह्यात ५ मे च्या अहवालानुसार २६ हजार ७१६ मजुरांना गावातच काम मिळाले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरुपाची कामे सुरू करून मजुरांना गावातच काम उपलब्ध करून दिले जाते. यंदा जिल्ह्यात आचारसंहितेपूर्वीच मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरींना मान्यता देऊन कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याशिवाय घरकूल बांधकाम, पाणंद रस्ता, फळबाग लागवड अशी कामे देखील सुरू असल्याने मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आजमितीस विविध यंत्रणेकडून २ हजार ३७२ कामे सुरू आहेत. ४९१ पैकी २७७ ग्रामपंचायती अंतर्गत ही कामे पूर्णत्वास जात आहेत. ग्रामीण भागातील मजुरांना हवे ते काम योजनेंतर्गत उपलब्ध केले जाते. ग्रामीण भागात विशेषत: उन्हाळ्यात कामाचा तुटवडा असतो. मजुरांना काम उपलब्ध नसल्याने त्यांना कामाच्या शोधात इतर जावे लागते; मात्र त्यांना रोहयो अंतर्गत गावातच काम उपलब्ध केले जाते. यासाठी मजुरांना काम मागणी अर्ज करणे आवश्यक ठरते. मजुरांना काम मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत स्तरावर कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत.