..................
वीजपुरवठ्यात व्यत्यय; नागरिक त्रस्त
वाशिम : शहर परिसरात दुपारच्या सुमारास धुवाधार पाऊस झाला. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून महावितरणकडून वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यात आला. परिणामी, नागरिकांची गैरसोय झाली. हा प्रकार नित्याचाच झाल्याची ओरड होत आहे.
................
वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी
वाशिम : शहराबाहेरच्या शेलू फाट्यानजीक वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून बुधवारी प्रत्येक वाहनचालकांकडील कागदपत्रांची तपासणी केली. नियम तोडणाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली.
...................
आधार केंद्र सुरू करण्याची मागणी
वाशिम : निर्बंध शिथिल होऊनही अनेक ठिकाणचे आधार केंद्र अद्याप बंद आहेत. त्यामुळे बँक व्यवहारांसह शासकीय कामांत अडचणी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागांसह शहरी भागांत आधार नोंदणी, दुरुस्ती केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
.....................
रेतीअभावी रखडली घरकुलांची कामे
वाशिम : चालूवर्षीही जिल्ह्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. ही परिस्थिती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कायम आहे. यामुळे रेती मिळेनाशी झाल्याने विशेषत: घरकुलांची कामे रखडली आहेत.
......................
वाशिम शहरातील माहूरवेशीची दुरवस्था
वाशिम : शहरातील पुरातन माहूरवेशीची पडझड झाली असून, हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तथापि, वेशीची डागडुजी करून साैंदर्यीकरण करण्याची मागणी श्याम उफाडे यांनी केली.