वाशिम : दुसरी लाट ओसरत नाही, तोच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक असल्याबाबत मत-मतांतरे असले तरी पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेतल्यास ही तिसरी लाट रोखता येऊ शकते, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला.
पहिल्या लाटेत ज्येष्ठ, दुसऱ्या लाटेत युवकांना मोठ्या संख्येने कोरोना संसर्ग झाला. तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने पूर्वतयारी सुरू केली. त्याचप्रमाणे पालकांनीदेखील आपल्या पाल्याच्या आरोग्याबाबत पावसाळ्याच्या दिवसात विशेष काळजी घेणे आवश्यक ठरत आहे. अति काळजी किंवा भीती न बाळगता योग्य ती दक्षता घेतली गेली पाहिजे. अगदी साध्या साध्या गोष्टी पाळून पालक हे आपल्या मुलांना सुरक्षित ठेवू शकणार आहेत. यात आहाराचीही महत्त्वाची भूमिका राहणार असून, घरचे ताजे जेवण हवे, यावर डॉक्टरांनी अधिक भर दिला आहे.
००००००००
बॉक्स
अशी घ्या बालकांची काळजी
- बालकांना संतुलित, पौष्टिक आहार द्यावा, नियमित देत असलेले अन्न हेच उत्तम आहे. बाहेरचे अन्न टाळावे. गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे टाळावे. नियमित लसीकरण करावे. पालकांनी आपण स्वत: बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी. फ्रीजचे पाणी, कोल्ड्रिंक्स, पावसात भिजणे याबाबींपासून लहान मुलांना दूर ठेवावे. मुलांना कसलाही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
०००००००००
कोट
कोणतीही भीती न बाळगता पालकांनी आपल्या पाल्याची विशेष काळजी घेतल्यास कोरोनापासून बालकांना दूर ठेवता येते. लहान मुलांना संसर्ग होण्याचा अधिक धोका हा घरातील वरिष्ठांकडूनच असतो. अशा स्थितीत पालकांनी स्वत: सुरक्षित राहिल्यास बालकांना कोरोना होण्याचा धोका कमी होईल. कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे पालकांनी टाळलेच पाहिजे. आहाराच्या बाबतीत नियमितचा संतुलित, पौष्टिक आहार घेतला तरी पुरेसा आहे.
- डॉ. विजय कानडे, बालरोगतज्ज्ञ.
०००००
पावसाळ्यात मुलांना सर्दी, ताप, खोकला होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुलांना पावसात भिजू न देणे, नियमित लसीकरण यासह आपल्यापासून मुलांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. इतर पालकांनीदेखील बालकांना कोरोना संसर्ग होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मुलांना घराबाहेर खेळायला शक्यतोवर पाठवू नये. मास्क, हात स्वच्छ धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
- प्रमोद ढाकरके,
पालक, वाशिम.