वाशिम, दि. २६- नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याला शेवटचे दोन दिवस शिल्लक असून, राजकीय पक्षाचे 'ए' व 'बी' फॉर्म मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. यामुळे राजकारण तापले असून, नाराजांची समजूत काढण्याची कसरत पक्ष नेतृत्त्वाला करावी लागणार आहे.येत्या २७ नोव्हेंबर रोजी वाशिम, कारंजा व मंगरुळपीर नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रमुख पक्षाने युती अथवा आघाडीकडे लक्ष न देता स्वबळावर इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. अद्यापही प्रमुख पक्षांची युती झाली नाही. प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्हे दिसून, उमेदवारही निश्चित केले जात आहेत; मात्र अद्याप अधिकृत घोषणा झाली नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. वाशिम, कारंजा व मंगरुळपीर या तीनही नगर परिषदेतील सत्ता ताब्यात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ या प्रमुख पक्षांनी जातीय समीकरण, पक्षाची ध्येयधोरणे आणि उमेदवारांची लोकप्रियता हेरून उमेदवार निश्चित करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. राजकीय पक्षाच्या वरिष्ठांकडून प्रत्येक पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे पक्षाचे ह्यएह्ण आणि ह्यबीह्ण फॉर्म सुपूर्द केल्याची विश्वसनीय माहिती असून, लवकरच अधिकृत उमेदवारांना सदर फॉर्म दिले जाणार आहेत. 'ए' आणि 'बी' फॉर्म मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच असून, गॉडफादरच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविले जात आहेत. सर्मथकांसह 'गॉडफादर'च्या भेटीगाठी घेऊन आपली उमेदवारी कशी 'सक्षम' राहील, हे पटवून दिले जात आहे. भारतीय जनता पार्टीने आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी, राजू पाटील राजे यांच्याकडे सर्व सूत्रे सोपविली आहेत तर काँग्रेसने माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, जिल्हाध्यक्ष अँड. दिलीप सरनाईक यांच्याकडे सूत्रे सोपविली. राष्ट्रवादी काँग्रेसने माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्याकडे तर शिवसेनेने खासदार भावना गवळी व जिल्हाध्यक्ष राजेश पाटील राऊत यांच्याकडे तर भारिप-बमसंची सूत्रे जिल्हाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांच्याकडे आहेत. वाशिम येथे शिवसेनेचा अपवाद वगळता उर्वरित पक्षांनी अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित केला नसल्याची माहिती आहे. काँग्रेस पक्षातर्फे सध्या दोन उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असून, ऐनवेळी कुणाच्या हातात अध्यक्ष पदाचे तिकीट पडते, याकडे लक्ष लागून आहे. भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांची मोठी रांग असून, जातीय समीकरण लक्षात घेऊन सावधगिरीने पाऊल टाकले जात आहे. देशात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने वाशिम येथे भाजपाची सत्ता कायम ठेवण्याची कसरत जिल्हाध्यक्ष पाटणी यांना करावी लागणार आहे. गतवेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे नेते सज्ज असून, ऐनवेळी दगाबाजी नको म्हणून अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण ठेवून असल्याचे दिसून येते. भारिप-बमसंने धक्कादायक तंत्राचा अवलंब करीत अल्पसंख्याक मतपेढीवर लक्ष केंद्रित करून सर्वांंचे राजकीय अंदाज चुकविण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करून प्रचाराची रणनिती आखण्याला सुरुवात केली आहे.
‘ए’ व ‘बी’ अर्जासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच!
By admin | Published: October 27, 2016 3:20 AM