मंगरूळपीर (जि. वाशिम) : गेल्या १५ ते २0 दिवासांपासून पावसाने दडी मारल्याने शेतामधील उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. तालुक्यातील चिखली झोलेबाबा येथील शेतकरी भगवान वर्हाडे यांनी रविवारी (दि.१२) आपल्या शेतात ट्रॅक्टर टाकून ६ एकरातील सोयाबीन पीक रोटावेटरद्वारे उद्ध्वस्त केले. दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास अनेक शेतकर्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार, यात शंका नाही. गेल्या दोन-तीन वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने तालुक्यातील शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बीबरोबर खरीप हंगामावर निर्सगाचा प्रकोप कायम आहे. यावर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली. जवळपास ९0 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. पेरणी नंतर काही दिवसात पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला. गेल्या १५ ते २0 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने उभी पिके वाळू लागली आहे. आकाशाकडे पाहून-पाहून शेतकर्यांच्या डोळय़ात पाणी येत आहे; मात्र मेघ बरसेनात, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. चिखली झोलेबाबा येथील युवा शेतकरी भगवान वर्हाडे यांच्याकडे ६ एकर शेती आहे. दमदार पावसानंतर त्यांनी पेरणी केली होती. पेरणीनंतर काही दिवसात पावसाने दडी मारल्यामुळे उभ्या पिकांनी माना टाकल्या. अशी परिस्थिती तालुक्यात सर्वत्रच आहे. जड अंत:करणाने वर्हाडे यांनी करपलेले सोयाबीन, ट्रॅक्टरच्या रोटावेटरद्वारे काढले आणि दुबार पेरणीसाठी जमिनीची मशागत करण्याला प्राधान्य दिले. आता दुबार पेरणीकरिता पुन्हा बी-बियाण्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. मंगरुळपीर तालुक्यात सर्वत्र पिके सुकून चालली आहेत. पिके करपून जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय शेतकर्यांना अन्य पर्याय नाही. दुबार पेरणीच्या चिंतेने तालुक्यातील शेतकर्यांची झोप उडाली आहे.
करपलेल्या पिकांवर ‘रोटावेटर’
By admin | Published: July 13, 2015 2:10 AM