लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘कोरोना’ संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी लागणारी औषधे, सामग्री खरेदी करताना अडचण भासू नये तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयसोलेशन वार्ड, क्वारंटाईन वार्ड सज्ज ठेवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये निधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी २ एप्रिल रोजी उपलब्ध करून दिला.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्याकडून २ एप्रिल रोजी आढावा घेतला. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील, तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात झाल्यापासून पालकमंत्री देसाई हे 'कोरोना' प्रतिबंधासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेत आहेत. जिल्ह्यात किराणा, धान्य, दूध, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा व औषधांचा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.औषधे, सामग्री खरेदीसाठी १ कोटी रुपये निधी‘कोरोना’ संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी लागणारी औषधे, सामग्रीचा पालकमंत्री देसाई यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी तातडीने निर्णय घेत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयसोलेशन वार्ड, क्वारंटाईन वार्ड सज्ज ठेवण्यासाठी आणि उपचारासाठी आवश्यक औषधे, सामग्री खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच आवश्यकता पडल्यास सन २०२०-२१ च्या आराखड्यातुन निधी उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या आहेत. या निधीमधून आवश्यक ती औषधे व सामग्रीची खरेदी लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त केली जात आहे.
'कोरोना' प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 11:55 AM