जिल्ह्यात गत खरीप हंगामातील प्रत्येकच शेतमालास निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली. तुरीचीही स्थिती कमीअधिक इतर शेतमालाप्रमाणेच आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण होते; परंतु तूर निर्यात करणाऱ्या देशात आलेली अस्थिरता आणि देशांतर्गत तुरीचा साठा अत्यंत कमी उरल्याने राष्ट्रीयस्तरावर तुरीची मागणी वाढली होती. त्याचा परिणाम स्थानिक बाजारावर चांगला झाला आणि सुरुवातीच्या काळात ५५०० ते ५६०० रुपये प्रति क्विंटल असलेले तुरीचे दर थेट ७ हजारांच्या वर पोहोचले. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि तुरीची आवकही वाढू लागली. अशातच गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू झाला. त्यामुळे विविध व्यवहारांवर मर्यादा आल्याने तुरीच्या खरेदीवरही परिणाम झाला आणि दरात घसरण सुरू झाली. गेल्या चारच दिवसांपूर्वी ७ हजार रुपयांच्या वर पोहोचलेले तुरीचे दर २०० रुपयांनी घसरून ६८५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दर घसरले असतानाच कोरोना संसर्गामुळे बाजारातील शेतमालाच्या आवकीवर परिणाम झाला असून, तुरीची आवकही घटली आहे.
-------------------
दरात पुन्हा तेजी येणार
राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे विविध व्यवसायांवर परिणाम झाल्याने शेतमालाच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. तथापि, पुढे शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पुन्हा नियंत्रित होऊन तुरीच्या दरात तेजी येण्याचा विश्वास व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तथापि, सद्य:स्थितीत मात्र दर घसरल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागल्याचे दिसत आहे.
------------------
जिल्ह्यातील तुरीचे किमान व कमाल दर
वाशिम ६०५०-६८७०
रिसोड ६६४०-६८३०
मानोरा ६५५०-६८५०
मं.पीर ५५००-६६९०
मालेगाव ६२००-६७८०