वाशिम : ग्रामविकास विभागाने ९ वर्षांनंतर ९ जून रोजी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान, महागाईच्या काळात ही वाढ तोकडी असून, संघटनेच्या मागणीनुसार तीन हजार रुपयाने वाढ करावी, असा सूर ग्रामसेवक संघटनेमधून उमटत आहे.
गावपातळीवर मूलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर असून, त्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकांसाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येते, तसेच ग्रामीण स्तरावर दिवाबत्ती, पाणी पुरवठा, आरोग्य संबंधित साहित्य व अन्य प्रशासकीय कामाकरिता तालुका स्तरावर जावे लागते. यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना १ जानेवारी २०१२ पासून दरमहा ११०० रुपये कायम प्रवास भत्ता देण्यात येतो. दरम्यान, महागाईच्या काळात प्रवास भत्त्यात वाढ करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली होती. ही मागणी लक्षात घेता ग्रामविकास विभागाने ९ जून रोजी प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली आहे. नऊ वर्षाच्या कालावधीत पेट्रोलच्या दरात जवळपास दुपटीने वाढ होत असताना आणि महागाई वाढलेली असताना प्रवास भत्त्यात केवळ ४०० रुपयांची वाढ झाल्याने ग्रामसेवक संघटनेमधून नाराजीचा सूर उमटत आहे. प्रवास भत्त्यात किमान तीन हजार रुपये वाढ करावी, अशी मागणी संघटनेने केली.
काय म्हणतात ग्रामसेवक?
नऊ वर्षांपासून ग्रामसेवकांना ११०० रुपये प्रवास भत्ता मिळत आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने प्रवास भत्ता तीन हजार रुपये करावा, अशी ग्रामसेवक संघटनेने शासनदरबारी मागणी केलेली आहे. यामध्ये केवळ ४०० रुपये वाढ करण्यात आली. किमान तीन हजार रुपये प्रवास भत्ता असणे अपेक्षित आहे.
- आत्माराम नवघरे
जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना