लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी अंतिम मुदतीपर्यंत अर्थात ३० मार्चपर्यंत ९६२ जागेसाठी १८९२ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील एकूण ९३ खासगी शाळांची नोंदणी झालेली आहे. एकूण ९६२ जागांसाठी ६ मार्च ते ३० मार्च या दरम्यान आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. अंतिम मुदतीपर्यंत १९८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे काही पालकांना आपल्या पाल्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. त्यामुळे प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. प्राप्त अर्जांमधून आता लॉटरी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पहिल्या लॉटरी पद्धतीत ‘घर ते शाळा’ या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया बालकांची पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी निवड केली जाणार आहे. लॉटरी पद्धतीने निवड करण्याचे वेळापत्रक अद्याप निश्चित नाही. पहिल्या लॉटरी पद्धतीचा दिनांक आणि ठिकाणाची माहिती संबंधित पालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कळविली जाणार आहे. पाल्याची निवड झाली किंवा नाही, याची माहितीदेखील मोबाईल क्रमांकावर दिली जाणार आहे.
आरटीई: अंतिम मुदतीपर्यंत मोफत प्रवेशासाठी १८९२ अर्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:08 PM