लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई अंतर्गंत (शिक्षण हक्क अधिनियम) चवथ्या लॉटरी पद्धतीतून ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील ८३८ बालकांची निवड झाली असून, २१ सप्टेंबरपर्यंत या बालकांचे प्रवेश संबंधित शाळांमध्ये घ्यावे लागणार आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास प्रवर्ग, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. अमरावती विभागात अंतिम मुदतीपर्यंत हजारो आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. तीन लॉटरी पद्धतीतून २५ टक्के कोट्यातील जागा भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. विहित मुदतीत अनेक बालकांनी प्रवेश घेतला नसल्यामुळे अनेक जागा रिक्त राहिल्या. या रिक्त जागांवर आॅनलाईन अर्ज सादर करणाºया बालकांना प्रवेश देण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी चवथी लॉटरी काढण्यात आली. यामध्ये राज्यातील ६९७२ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. यामध्ये अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्यातील ८८ याप्रमाणे यवतमाळ १७८, अकोला १२१, अमरावती २४३ आणि बुलडाणा २०८ अशा एकूण ८३८ बालकांचा समावेश आहे. या बालकांना ११ ते २१ सप्टेंबर या कालावधीत संबंधित शाळेत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. निवड झालेल्या बालकांच्या पालकांना संबंधित पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पडताळणी समितीसमोर आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत संबंधित शाळा तसेच संबंधित पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क न साधल्यास बालकांना मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.
मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत ९ सप्टेंबर रोजी चवथी लॉटरी काढण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ८८ बालकांची निवड झाली. या बालकांनी प्रवेशासाठी २१ सप्टेंबरपर्यंत संबंधित शाळा किंवा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.- अंबादास मानकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, वाशिम