वाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत प्रतिक्षा यादीतील बालकांना संबंधित शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी आता २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ही मुदत ८ ऑक्टोबर अशी होती. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे मोफत प्रवेश प्रक्रियादेखील प्रभावित झाली. आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ९७६ बालकांची निवड झाली. पहिल्या लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर ३० सप्टेंबरपासून प्रतीक्षा यादीतील बालकांना ८ ऑक्टोबरपर्यंत मोफत प्रवेशाची संधी दिली होती. या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील ९७६ पैकी ६०७ बालकांनी प्रवेश घेतले. उर्वरीत ३६९ बालकांचे प्रवेश झाले नसल्याने त्यांना मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागले. या बालकांना आणखी एक संधी मिळावी, अशी मागणी विविध स्तरातून झाली. याची दखल घेत पुन्हा मुदतवाढ मिळाली असून, २३ ऑक्टोंबरपर्यंत शाळा स्तरावरच बालकांना कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.(प्रतिनिधी)
आरटीई : मोफत प्रवेशासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 12:09 PM