लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी अनेक पालक उदासिन असल्याचे दिसून येते. वारंवार मुदतवाढ मिळूनही अद्याप ३६९ पालकांनी आपल्या पाल्याचे आवश्यक ते कागदपत्रे सादर केली नाहीत. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे मोफत प्रवेश प्रक्रियादेखील प्रभावित झाली. पहिल्या लॉटरी पद्धतीत वाशिम जिल्ह्यातील ९७६ बालकांची निवड झाली. निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर ३० सप्टेंबरपासून प्रतीक्षा यादीतील बालकांना मोफत प्रवेशाची संधी दिली जात आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत या बालकांना मोफत प्रवेशासाठी कागदपत्रे ही संबंधित शाळेत दाखल करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ९७६ पैकी आतापर्यंत ६०७ बालकांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरीत ३६९ बालकांचे अद्याप प्रवेश झाले नाहीत.
आर्थिक दृृष्ट्या दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण आहे. पहिल्या लाॅटरी पद्धतीत जिल्ह्यातील ९७६ बालकांची निवड झाली. कागदपत्रे सादर केल्याने आतापर्यंत ६०७ बालकांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरीत पालकांनी २३ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करावी. खोटा उत्पन्नाचा दाखला आणि शाळेजवळील बनावट रहिवासी प्रमाणपत्र दाखल करुन प्रवेश मिळविला जात असल्याची एकही तक्रार शिक्षण विभागाकडे आली नाही.- अंबादास मानकर शिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जिल्हा परिषद वाशिम.