वाशिम : राईट टू एज्युकेशनच्या (आरटीई) २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी पहिल्या लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या ५४३ पैकी ३४३ बालकांचे पहिल्या वर्गासाठी मोफत प्रवेश झाले आहेत. एकूण ९३ शाळेतील ९६५ जागांसाठी मोफत प्रवेश द्यावयाचे असून आता दुसºया लॉटरी सोडतीची प्रतिक्षा लागून आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग आदी प्रकारातील पालकांच्या पाल्याला पहिल्या वर्गात मोफत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई अंतर्गत सर्व माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ९३ खासगी शाळांची नोंदणी झालेली असून, एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८७० प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांमधून पहिल्या लॉटरी पद्धतीतून ‘घर ते शाळा’ या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया ५४३ बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. अंतिम मुदतीपर्यंत ३४३ बालकांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरीत २०० बालकांनी प्रवेश घेतले नसल्याने या जागा रिक्त आहेत. ९६५ पैकी केवळ ३४३ प्रवेश झाल्याने उर्वरीत ६२२ रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दुसरी लॉटरी सोडत केव्हा काढली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.
आरटीई: मोफत प्रवेशाच्या दुसऱ्या सोडतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:28 PM