वाशिम : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सन २0१६-१७ या आर्थिक वर्षात २२ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला. एकूण उद्दिष्ट १९.८0 कोटींचे असताना, उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ११२ टक्के महसूल वसुली केली. वाहनांना परवाना देण्याबरोबरच वाहतूक नियमांची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी परिवहन विभागावर सोपविण्यात आली आहे. विविध प्रकारची महसूल वसुली करण्याबरोबरच वाहतुकीच्या नियम पायदळी तुडविणार्या वाहनचालकांविरुद्धही दंडात्मक कारवाई केली जाते. सन २0१६-१७ या वर्षात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या एकूण ४८७६ वाहनांविरुद्ध कारवाई करीत १ कोटी ४९ लाख ४७ हजार रुपये दंड व ९६ लाख २३ हजार रुपयांची करवसुली करण्यात आली. धोकादायकरीत्या वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे, ओव्हर लोड वाहतूक करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, विनापरवाना वाहन चालविणे, कराचा भरणा न करणे इत्यादी विविध गुन्ह्यांबाबत या ४८७६ वाहनांविरुद्ध उपरोक्त कारवाई केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी स्पष्ट केले. याशिवाय टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक इत्यादी परवानाधारक वाहन मालकांकडून २0 लाख २२ हजार ७४७ रुपयांचा व्यवसाय करही वसूल करण्यात आला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या १0१ व्यक्तींच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
‘आरटीओ’ची २२ कोटींची महसूल वसुली!
By admin | Published: April 11, 2017 2:09 AM